नेरूळ पश्‍चिमेकडील रिंगरूट बससेवेचा मार्ग वाढवा

नवी मुंबई, 18 जुलै 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने नेरुळ पश्चिम परिसरात सुरू केलेली रिंगरुट बससेवेचा मार्ग सीवूडपर्यंत वाढवावा, अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

रिंगरुट बससेवेचा मार्ग वाढविल्यास नागरिकांना फायदा होईलच शिवाय परिवहनचे उत्पन्न वाढण्यासही हातभार लागेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.

नेरूळ पश्‍चिम परिसरात सुरु केलेल्या रिंगरूट बससेवेचा मोजक्याच लोकांना फायदा होत आहे. त्याचा परिणाम परिवहन उपक्रमासाठीही ही बससेवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरत नाही. त्यामुळे भविष्यात अपुर्‍या प्रवासी सेवेचे कारण पुढे करून परिवहन उपक्रम ही बससेवा बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बससेवेचा मार्ग सानपाडा रेल्वे स्थानक ते जुईनगर रेल्वे स्थानक व त्यानंतर पुढे नेरूळ पश्‍चिमपर्यंत आहे, त्याचा विस्तार करावा आणि ही बस  सीवूडस रेल्वे स्थानकापर्यत घेवून गेल्यास या बससेवेचा खर्‍या अर्थांने सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि सीवूड्स या चारही भागातील लोकांना फायदा होईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

शनिवार, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हीच बससेवा सीवूड्स रेल्वे स्थानकापासून पुढे सीवूडस सुधाकरराव नाईक उड्डाणपुलावर वंडर्स पार्क या ठिकाणापर्यत वाढविण्यात यावी की जेणेकरून सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स परिसरातील मुलांना व त्यांच्या पालकांना वंडर्स पार्क या ठिकाणी जाणे उपयुक्त ठरेल. शिवाय परिवहन उपक्रमालाही या प्रवासी सेवेचे अधिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.