ठाणे महापालिका आयुक्तांचा इशारा
ठाणे,17 जुलै 2017/AV News Bureau:
ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाची वसुली समाधानकारक न झाल्यामुळे नाराज झालेल्या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. यापुढे जे विभाग वसूलीचे दिलेले उद्दीष्ठ पूर्ण करणार नाहीत, त्यांचे पगार थांबविण्यात येतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान यापुढे पाणी बिले ऑननलाइन पद्धतीने घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
महापालिकेच्या विविध विभागाच्या उत्पन्नाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नागरी संशोधन केंद्रात आज बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना वसूलीचे उद्दीष्ठ पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मालमत्ता कर, पाणी कर, शहर विकास विभाग, या प्रमुख स्रोतासह महापालिकेच्या विविध विभागामार्फत जी वसुली होत आहे. मात्र ही वसूली जलदगतीने होण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, ज्या ठिकाणी पाणी अथवा मालमत्ता कराची बिले वितरित करण्यात आली नसतील त्या सर्व ठिकाणी या शुक्रवारपर्यंत सर्व बिले वितरित करावीत असे आयुक्तांनी सांगितले.