राष्ट्रपती पदासाठी 287 विधानसभा सदस्यांचे मतदान

मुंबई, 17 जुलै 2017/AV News Bureau:

राष्ट्रपती पदासाठी आज एकूण विधानसभेच्या 288 सदस्यांपैकी 287 सदस्यांनी मतदान केले.  तर एका राज्यसभा सदस्याने राज्यात मतदान केले.

विधानभवनात सकाळी ठीक दहा वाजता सुरु झालेल्या या मतदानात पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदान केले. सुरळीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11.25 मिनीटांनी मतदान केले.

पहिल्या टप्प्यात एका तासात 85 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री मदन येरावार, विजय देशमुख यांचा समावेश होता.

दुपारी बारा पर्यंत 191 मतदारांनी मतदान केले. यात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री रवींद्र वायकर, दादाजी भुसे तर दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 257 विधानसभा सदस्यांनी तसेच राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी मतदान केले. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य सदस्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट यांच्यासह 287 सदस्यांनी मतदान केले.