नवी दिल्ली, 17 जुलै 2017:
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. संसद आणि विधीमंडळाच्या सदस्यांनी ससंद भवन आणि राज्यांच्या विधानभवनांमधील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. 20 जुलै रोजी मतमोजणी झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या नावावर शिक्का मोर्तब होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बसप अध्यक्षा मायावती आणि इतर सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
भाजपचे उमेदवारी रामनाथ कोविंद यांच्याकडे सुमारे 63 टक्के मते आहेत. तर माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना 17 पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या पाठिशी असल्याचे मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.