नवी दिल्ली, 17 जुलै 2017/AV News Bureau:
देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तर्फे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद तर काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीतर्फे लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवित आहेत.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदासाठी कँग्रेस आघाडीकडून पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून आज उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
संसदेसह संपूर्ण देशातील विधानसभा आणि विधान परिषदांमध्ये आज सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी सर्व सदस्यांना आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. २० जुलैला मतमोजणी होणार झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मीरा कुमार यांच्या तुलनेत कोविंद यांच्याकडे सुमारे ६३ टक्के मते आहेत. तर मीरा कुमार यांना १७ पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 4 हजार 896 मतदार आहेत. त्यामध्ये 776 खासदार तर 4120 आमदार आहेत.