जम्मू काश्मीर,17 जुलै 2017/AV News Bureau:
जम्मू काश्मीर महामार्गावर रामबन येथे अमरनाथ यात्रेकरूंना घेवून जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भिषण अपघातात 16 भाविकांचा मृत्यू झाला तर सुमारे 29 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भिषण अपघात काल दुपारी झाला.
जम्मू काश्मीर राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून अमरनाथ यात्रेकरु प्रवास करीत होते. काल दुपारी बस जम्मूहून पहलगामकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस खोल दरीत कोसळली. मृतांमध् उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, आसाम तसेच हरियाणा राज्यातील भाविकांचा समावेश आहे.
अमरनाथ देवस्थानने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
वैष्णोदेवी मार्गावरही काल भूस्खलन झाल्यामुळे नऊ भाविक जखमी झाले आहेत.
दरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेचा काल मृत्यू झाला आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या भाविकांची संख्या आठवर पोहोचली आहे.