मुंबई ,13 जुलै 2017/AV News Bureau:
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या द्राक्षाचे नवीन वाण राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे जागतिक स्तरावर निविदा काढण्यात येणार आहे. द्राक्षाचे नवीन वाण महाराष्ट्रात आणून त्याचे उत्पादन करण्यात येईल आणि राज्यातील द्राक्षे मोठ्या प्रमाणात युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातील.
जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या द्राक्षाच्या नवीन वाणांवर ब्राझील, अमेरिका, इस्त्राईल या देशांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रीक टन इतकी द्राक्ष निर्यात दर वर्षी होते. नेदरलँड, जर्मनी, युरोप या देशांमध्ये महाराष्ट्रातील द्राक्षांना मागणी आहे, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी दिली.
परदेशात मागणी असलेल्या द्राक्षाच्या नवीन वाणांची महाराष्ट्रात उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत असे वाण पुरवणाऱ्यांसाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी येणारा खर्च ५० टक्के अपेडा, २५ टक्के केंद्रीय कृषी विभाग आणि २५ टक्के राज्य सरकार देणार आहे.
बेदाण्यांचीही दरवर्षी ५० हजार टन निर्यात केली जाते. द्राक्षाबरोबरच जागतिक बाजारपेठेत बेदाणा निर्यातीचे उद्दिष्ट दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारमार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. पुढील अनेक वर्ष द्राक्ष व बेदाणा ही उत्पादने निर्यात बाजारात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगितले.