नवी दिल्ली, 10 जुलै 2017/AV News Bureau:
पाकिस्तान आणि चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपानचा संयुक्त नौदल सराव आजपासून सुरू झाला. 17 जुलैपर्यंत चालणाऱ्या या नौदल सरावात तिन्ही देशांच्या 16 मोठी लढाऊ जहाजे, 95 एअरक्राफ्ट आणि 2 पाणबुड्या सहभागी झाल्या आहेत. तिन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक सुदृढ आणि बळकट करणे हा यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे तिन्ही देशांनी म्हटले आहे.
युएस स्ट्राइक ग्रुप 11 चे कमांडर रियल एडमिरल विल्यम जी ब्रायन यांनी सांगितले की, आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या कोणत्याही संकटाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यास तयार आहोत.
1992 पासून बंगालच्या उपसागरात अमेरका आणि भारत संयुक्तपणे नौदल सरावाचे आयोजन करत आहे. तर गेल्या चार वर्षांपासून सातत्याने जपानचे नौदलही या युद्ध सरावात भाग घेत आहे.
सिक्किम सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे मित्र राष्ट्रांच्या नौदलासोबत युद्ध सराव सुरू झाल्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष या नौदल युद्ध सरावाकडे लागले आहे.