सरकारी अधिकाऱ्यास लाच देणाऱ्याला पकडले

ठाणे, 7 जुलै 2017/AV News Bureau:

मालमत्ता कर कमी करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेडिकल स्टोअरच्या मालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून  (रिव्हर्स ट्रॅप) रंगेहाथ पकडले.

शंकर लालचंद शिवानी या व्यक्तीचे मेडिकल स्टोअर आहे. शिवानी यांनी मेडिकल स्टोअर आणि रहिवाशी मालमत्तेचा कर कमी करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या कर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार केली. सदर तक्रारीची शहानिशा केल्यानंतर  6 जुलै रोजी महापालिकेच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला आणि शंकर शिवानी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला  पन्नास हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती ठाणे अँटी करप्शन विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.