शिवसेना ढोल बजाओ आंदोलन करणार

मुंबई, 6 जुलै 2017/AV News Bureau:

शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार आपापल्या जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा बॅंकांसमोर येत्या 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ढोल बजाओ आंदोलन करणार आहेत. जिल्हा बॅंकांकडून प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मागवून प्रत्येक जिल्हा बॅंकेने आपल्या फलकावर लावावी आणि कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी जिल्हा बॅंकांच्या अध्यक्षांना निवेदन देऊन करण्यात येणार आहे.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँकांमध्ये  जाऊन लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक जिल्हा बँकेच्या बाहेर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी टेबल-खुर्ची लावून बसणार आहेत. या माध्यमातून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, याची माहितीही उपलब्ध होणार असल्याचे शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी म्हटले आहे.