नवी मुंबई, 6 जुलै 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांचा साठा व विक्री करणा-या व्यावसायिकांवर कारवाई करून तब्बल 2 हजार 200 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला आहे. यावेळी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 30 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
तुर्भे सेक्टर 19 येथील कृषी प्लाझा मध्ये आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या तब्बल 101 गोणीतील 2200 किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकपिशव्या जप्त करून या प्लास्टिक पिशव्यांची वाहतुक करणारा टेम्पो क्रमांक एम.एच.04 जीएफ 8422 जप्त करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली ही धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.
बेलापूर विभागात सेक्टर 11 येथील साईनाथ वाईन्स व परशुराम गावडे शॉप तसेच सेक्टर 50 नेरुळ येथील मोहन चौधरी शॉप, ओमकार मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, भैरवनाथ डेरी आणि सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील शिवआरती डेअरी या सहा दुकानांमधून 7 किलो 300 ग्रॅम इतका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करून प्रत्येकी 5000/- प्रमाणे 30 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.