जीएसटी प्रणालीअंतर्गत नुकसानभरपाई
मुंबई, 5 जुलै 2017/AV News Bureau:
वस्तू आणि सेवा करप्रणालीच्या अंमलबजावणीमुळे महापालिकेचे जकातीचे उत्पन्न बंद झाले. त्याची भरपाई दरमहिन्याला ५ तारखेच्या आत करण्याचे बंधन घालून घेतांना शासनाने यात दरवर्षी ८ टक्के वृद्धीदर गृहित धरून भरपाईची रक्कम देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा अग्रिम धनादेश आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महापालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, संसद तसेच विधिमंडळ सदस्य आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईचे देशाच्या आर्थिक शक्तीत तसेच प्रगतीत मोठे योगदान असून मुंबईशिवाय महाराष्ट्राचा विचारही होऊ शकत नाही. त्यामुळे वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू करतांना सर्वसामान्य मुंबईकरांचा हक्काचा निधी कायद्याच्या चौकटीत राहून दर महिन्याला ५ तारखेपूर्वी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो दिलेला शब्द आज शासन पाळत असून वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला हा धनादेश आज मी देत आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्य आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली झाले तर यापेक्षा अधिकची रक्कम देण्यासही शासन मागे-पुढे पाहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबईच्या सुरक्षिततेसाठी नाके रद्द होऊ नयेत- उद्धव ठाकरे
वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एखादी नवीन गोष्ट आणल्यानंतर त्याचा आढावा घेण्याची व गरज पडल्यास सुधारणा करण्याची गरज असते. तशाच पद्धतीचा विचार या करप्रणालीची अंमलबजावणी करताना केला जावा असे सांगून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य मुंबईकरांना उत्तम सेवा-सुविधा देता याव्यात यासाठी मुंबई महापालिकेचे उत्पन्न जसे महत्वाचे होते तसेच मुंबईची सुरक्षितताही आता जकात रद्द झाल्याने जकात नाक्यांची भूमिका काहीच राहिली नाही. परंतू शासनाने मुंबईच्या सुरक्षिततेसाठी हे नाके रद्द करू नयेत. तेथे पोलिसांची नियुक्ती करून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले.
मात्र याच कार्यक्रमात शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. पालिका सभागृहात शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.
भाजप- शिवसेना नगरसेवकांच्या घोषणा
याच कार्यक्रमादरम्यान भाजपा नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. तर त्याला उत्तर म्हणून शिवसेना नगरसेवकांनी ‘चोर है चोर है’ च्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण तापले होते. अखेर महापौरांनी या नगरसेवकांना शांत केले.