दहशतवाद, विज्ञान, अंतराळ संशोधन, सायबर सुरक्षेसंबंधी करार होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 4 जुलै 2017/AV News Bureau:
पाकिस्तानच्या दिशेने भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि चीनकडून सध्या सुरू असलेल्या कुरापती या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा ऐतिहासिक इस्रायल दौरा आजपासून सुरू होणार आहे. इस्रायलचा दौरा करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू स्वतः मोदी यांचे स्वागत करणार आहेत. या दोन महत्वाच्या नेत्यांच्या भेटीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
गेल्या 70 वर्षांत प्रथमच भारतीय पंतप्रधान इस्रायलच्या भूमीवर पाय ठेवणार आहे. 1992 मध्ये दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंधांना अधिक चालना मिळाली होती. त्यावेळी संरक्षण आणि कृषी क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला होता. आता या राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. या इस्रायल दौऱ्यात दहशतवाद, विकास, व्यापार, विज्ञान, अंतराळ संशोधन तसेच सायबर सुरक्षेसंबंधी अनेक क्षेत्रांमध्ये विविध करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाणी संरक्षण, पाण्याचा पुनर्वापर, सिंचन आदी क्षेत्रात इस्रायलचे जगात अव्वल मानला जातो. भारतासमोर असलेली पाण्याचे संकट आणि कृषी क्षेत्रातील आव्हाने यामुळे मोदींचा हा दौरा भारतासाठी महत्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या दौऱ्यात मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान यांच्यामध्ये दहशतवादाशी दोन हात करण्याबाबत महत्वाची चर्चा होणार आहे. कारण दोन्ही देश दहशतवादी कारवायांनी त्रस्त आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते दहशतवाद विरोधात कोणती भूमिका घेतात, याकडे दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या संघटना आणि देशांचे बारीक लक्ष लागले आहे.
1992 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव सरकारने इस्रायलसोबत पहिल्यांदा राजनैतिक संबंधांना चालना दिली होती. त्यनंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील इस्रायलच्या राष्ट्रपतींना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. आता पंतप्रधान मोदी इस्रायलच्या दौरा करीत आहेत. त्यामुळे या भेटीत भारतासाठी अनेक सकारात्मक गोष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.