मोनोरेलच्या दुस-या टप्प्यातील निर्धारीत स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी
मुंबई दि. 3 जुलै 2017/AV News Bureau:
मुंबई मोनोरेलच्या दुस-या टप्प्याचा मार्ग वडाळा डेपो ते जेकब सर्कल असा आहे. या मार्गावरील वडाळा भागातील स्थानकाचे नाव दादर पूर्व असे ठरवले आहे. ज्या ठिकाणी हे स्थानक आहे त्याच्या बाजूलाच महाराष्ट्राचे अराध्य दैवत विठ्ठलाचे 399 वर्ष जुने मंदिर आहे, त्यामुळे या स्थानकाला विठ्ठल मंदिर स्थानक असे नाव द्यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे एमएमआरडीए आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्याकडे केली आहे.
वडाळ्यातील विठ्ठल मंदिराला यावर्षी 400 वर्ष पूर्ण होत आहेत. संत तुकाराम महाराजांनी स्वतः या मंदिराच्या स्थापनेचा दगड रचला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी 3 ते 4 लाख भाविक या मंदिराला भेट देतात.प्रति पंढरपूर अशी या मंदिराची ओळख आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या या मंदिराजवळील मोनो रेल्वेच्या स्थानकाला विठ्ठल मंदिर असे नाव द्यावे अशी भाविकांची व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. 4 जुलै रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून ही आपण ही मागणी मान्य करावी अशी विनंती डॉ. वाघमारे यांनी आयुक्त मदान यांना केली.