मुंबई, 3 जुलै 2017/AV News Bureau:
वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाइलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
राज्यभरातील सुमारे 1 कोटी 39 लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइलक्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीज बिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाइलवर पाठविण्यात येतो. याएसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीजबील भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाइलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीजबील भरणा केंद्रात वीज बील भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्राहकांनी महावितरणच्या कॉलसेंटर टोल फ्री क्र.18002003435/18002333435/19120 येथे तसेच महावितरणचे मोबाइल अप अथवा महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in येथे मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.