ठाणे, 1 जुलै 2017/AV News Bureau:
घराच्या दुरूस्तीसाठी परवानगी देण्याच्या बदल्यात 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेची वॉर्ड ऑफिसरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. स्वाती संजय गरुड असे लाच घेणाऱ्या वॉर्ड ऑफिसरचे नाव आहे.
तक्रारदार यांनी आपल्या घराच्या दुरूस्तीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जे वॉर्ड येथे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र दुरूस्ती अनधिकृत असून त्यावर कारवाईची धमकी देत स्वाती संजय गरुड या महिला वॉर्ड ऑफिसरने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे सापळा रचून 25 हजार रुपयांची रक्कम लाचेपोटी स्वीकारताना अँटी करप्शनच्या पथकाने स्वाती संजय गरुड या वॉर्ड ऑफिसरला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बाळा कुंभार अधिक तपास करीत आहेत.