1 जुलैपासून प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार बंधनकारक
नवी दिल्ली, 30 जून 2017:
नागरिकांना आधार क्रमांक किंवा आधार नोंदणीदरम्यान दिलेल्या ओळख क्रमांकाशिवाय 1 जुलैपासून प्राप्तीकर विवरणपत्र भरता येणार नाही. त्यामुळे प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार कार्ड वा नोंदणी अनिवार्य होणार आहे. मात्र नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार नाही, असे कर विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पॅनकार्डशी आधार कार्ड जोडण्याची 1 जुलैची मुदत उद्या संपणार आहे. या मुदतीत आपले आधारकार्ड न जोडल्यास पॅनकार्ड रद्द होईल, अशी भिती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र जे नागरिक 1 जुलैपर्यंत आपले आधार कार्ड पॅन कार्डशी जोडू शकणार नाहीत.ते आपले ई प्राप्तीकर विवरणपत्र भरताना भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणाने दिलेल्या क्रमांकाचा उल्लेख करू शकतात. ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड पॅनकार्डशी जोडले नसेल, त्यांचे पॅनकार्ड रद्द होणार नाही. तसेच 1 जुलैपासून पॅनकार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड अनिवार्य असल्याचे कर विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच आधारशी न जोडले गेलेले पॅन रद्द करण्याबाबतच्या निर्णयाची घोषणा नंतर करण्यात येण्याची शक्यता आहे.