ठाणे, 28 जून 2017/AV News Bureau:
ठाणे जिल्हा परिषदेच्या औषध विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे असणारे दोन ठिकाणच्या कामाचे चार्ज कायम ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले. डॉ. मिलिंद चिद्दरवार असे लाच मागणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार जिल्हा परिषद, ठाणे येथे आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची बदली ठाणे कार्यालयातून बदलापूर येथे झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्याकडे ठाणे आणि बदलापूर येथील दोन्ही चार्ज ठेवले आहेत. मात्र दोन्ही ठिकाणच्या कामाचे चार्ज कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागातील प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार याने तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार याला रंगेहाथ पकडल्याची माहिती एसीबी ठाणेचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.
प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.