मुंबई, 23 जून 2017/AV News Bureau:
वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे अशा काही वैयक्तिक लाभाच्या योजना रोहयो विभागामार्फत राबविण्यात येतात. यासाठीचे सिमेंट, वीट, वाळू, स्टील इत्यादी साहित्य खरेदीसाठीचा निधी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे,अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत आज दिली.
वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी या आधी ग्रामपंचायतींमार्फत साहित्य खरेदी करून लाभार्थ्यांना पुरविले जात होते. शासनाकडून ग्रामपंचायतीमार्फत विक्रेत्यास निधी देण्यात येत होता. मात्र, विक्रेत्यांकडून शेतकरी लाभार्थ्यांना प्रदानास विलंब होत होता. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर योजनांचा लाभ मिळाल्यास योजनांना गती येईल, म्हणून यापुढे आता साहित्य खरेदीसाठीचे कुशल पेमेंट थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यालाच वेंडर म्हणून नियुक्त करण्याचा मानस आहे. लाभार्थ्याने स्वखर्चाने साहित्य खरेदी केल्यानंतर त्याचे देयक ग्रामरोजगार सेवकाकडे जमा करावे, त्यानंतर 7 दिवसांच्या आत या देयकांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे रावल यांनी सांगितले.
- रोहयोचे ई-मस्टर आता ग्रामपंचायत स्तरावर
मजूरांची मागणी व काम सुरू करण्यामध्ये होत असलेल्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ई – मस्टर आता तालुका स्तराऐवजी ग्रामपंचायत स्तरावरूनच काढण्याचा निर्णय रोहयो विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे मजुरांना आपली मजूरी वेळेत म्हणजे 15 दिवसांच्या आत मिळणार असल्याचे रावल यांनी सांगितले.