शिवसेनेचे लोकप्रतिनिधीही एक महिन्याचे मानधन देणार
मुंबई, 23 जून 2017/AV News Bureau:
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारचे सर्व कर्मचारी, अधिकारी आपला येत्या जुलै महिन्यातील एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांसाठी स्वच्छेने द्यावे असे आवाहन करून राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आपले एक महिन्याचे मानधन राज्य सरकारकडे जमा करणार आहेत. याबाबतचे पत्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्य सचिवांना दिले आहे.
शेतकऱ्यांना कर्ज माफ करावे या मागणीसाठी सत्तेत असूनही शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी आपले एक महिन्याचे मानधन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी द्यावे, अशी सूचना केली होती. या सूचनेनुसार सर्व लोकप्रतिनिधींनी आपले एक महिन्याचे मानधन सरकार दरबारी जमा करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार मुख्यसचिवांना पत्र देण्यात आल्याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली.