श्रीहरीकोट्टा, 23 जून 2017:
अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताच्या इस्रोचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कार्टोसॅट -2 मालिकेतील उपग्रह मालिकेतील 712 किलो वजनाच्या उपग्रहासह तब्बल 31 उपग्रह एकाचवेळी अंतराळात यशस्वीपणे सोडण्याचा भीमपराक्रम आज केला आहे. श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रावरून या उपग्रहांसह पीएसएलव्ही सी-38 हे रॉकेट यशस्वीपणे अंतराळात सोडण्यात आले. आज सकाळी 9.25 ला हे रॉकेट अंतराळात झेपावले. या मोहिमेद्वारे अमेरिका, फ्रान्स, जपानसह 14 देशांचे उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत. या कामगिरीमुळे इस्रोच्या शास्रज्ञांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
- कार्टोसॅट-2 चा उपयोग
कार्टोसॅट-2 मालिकेतील उपग्रहात अत्याधुनिक आणि उच्च श्रेणीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे पुढील पाच वर्षे कार्यरत राहणार आहेत. कार्टोसॅट-2 उपग्रहामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नियोजन, सागरी किनारपट्टी भागातील भू वापरासंबंधीचे नियम,रस्त्यांचे जाळे उभारणे आदी कामे सहजशक्य होणार आहेत.
- 14 देशांचे उपग्रह
एकाचवेळी 31 उपग्रह अवकाशात सोडण्याची ऐतिहासिक कामगिरी भारताने आज केली. 712 कि.ग्रॅ. वजनाचा कार्टोसॅट-2 मालिकेतील उपग्रह आणि अन्य 30 उपग्रहांचे एकूण 243 किलो वजन असे एकूण 955 किलो वजनाचे 31 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. यामध्ये अमेरिका, इंग्लंड,फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जिअम, चिली, चेक रिपब्लिक, फिनलंड, जर्मनी, इटली, जपान, लाटविया, लिथुनिया, स्लोवाकिया या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.