पुणे महापालिकेचा देशातील पहिला ‘बॉण्ड’ खुला

मुंबई, 22 जून 2017/AV News Bureau:

पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला.शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्ड्‌सच्या माध्यमातुन निधी उभारला जाणार आहे.

‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. पुणे महापालिकेने त्याचा पाया रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि अन्य उपस्थित होते. मुख्यमंत्री व नायडू यांच्या हस्ते शेअर बाजाराच्या परंपरेप्रमाणे बेल वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला.

पुणे महापालिकेसह राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. नागरी प्रशासनाच्या कामात परिवर्तन होताना दिसत आहे. विविध पायाभुत सुविधांच्या विकास प्रकल्पांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी नवीन साधनांची गरज भासते. अशावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, महापालिकेन स्वत:चा निधी उभारण्यासाठी शेअर बाजारात बॉण्ड आणावेत. या आवाहनाला सकात्मक प्रतिसाद देत 2264 कोटी रुपयांच्या बॉण्ड पुणे महापालिकेने गुंतवणुकीसाठी दाखल केले आहेत. पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. केंद्र शासनातर्फे देशभरात शहर विकासाकरीता 4.13 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय सहाय मिळाल्यावर त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभाग दिला पाहिजे. त्याचबरोबर शहरांनी आणि त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:चा निधी उभारणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांच्या सुधारणांवर भर देण्यात येत आहे. जी शहरे अधिक चांगल्या पद्धतीने विकासाची कामे करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के निधी देण्यात येईल, असेही नायडू म्हणाले.