नवी दिल्ली, 22 जून 2017/ AV News:
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी युपीएने (United Progressive Alliance) माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांची उमेदवारी आज निश्चित केली. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी एनडीए (National Democratic Alliance-NDA) तर्फे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली असून ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
युपीएच्या नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीला बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माकपचे सीताराम येचुरी, आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद, राष्ट्रवादीचे शरद पवार, सपा नेते रामगोपाल यादव, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, द्रमुक नेते कनिमोळी आणि अन्य नेते उपस्थित होते.
राष्ट्रपतीपदाची निवड सर्वसंमतीने व्हावी यासाठी भाजपतर्फे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली होती, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले होते. मात्र युपीएच्या घटक पक्षांनी आपला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार रिंगणात उतरविला आहे.
दरम्यान एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.