दुर्धर आजाराने ग्रासलेले असतानाही 10वीत मिळविले 95 टक्के गुण
अमुलकुमार जैन/बोर्ली-मांडला, 21 जून 2017:
खूप शिकायचं… मोठं नाव कमवायचं…असे प्रत्येक मुला मुलीप्रमाणे तिनेही स्वप्न बघितले होते. मात्र दुर्धर आजाराने तिची वाट अडवली. शाळेच्या बाकाऐवजी घरातील बिछाना तिच्या नशिबी आलेला. आता आपल्या स्वप्नांचे काय होणार असा विचार तिच्या मनात डोकावला. तेवढ्यात शाळाच तिच्या घरी आली. आणि शिक्षक, वर्गमित्र तसेच लोकांच्या आशिर्वादाचे बळ मिळाल्यावर दुर्धर आजाराशी दोन हात करीत तिने दहावीची परीक्षा दिली आणि 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत तिने आपल्या स्वप्नांची उंची अधिक वाढवली.
पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात, तर शिक्षक व शाळा हे मुलांचे दुसरे पालक असतात हे म्हणणे अलिबागमधील सेंटमेरी शाळेने शब्दशः खरे करून दाखविले. लिना विठ्ठल पवार या दहावीतील विद्यार्थिनीला दुर्धर आजाराने ग्रासलेले असताना शाळेच्या शिक्षकांनीच तिचे पालकत्व स्वीकारले. सेंटमेरी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन, शाळेतील इतर विदयार्थ्यांचे पालक आदींनी विद्यार्थीनीच्या उपचारांसाठी लागणाराला लाखो रूपयांचा निधी वर्गणी काढून जमा केलाच परंतु शिक्षकांनी लिनाच्या घरी जावून तिचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. शिक्षकांनी तिच्यावर घेतलेली मेहनत आणि लिनाची जिद्दा यामुळे निम्मे वर्ष अंथरूणाला खिळून असूनही लिनाने दहावीच्या परिक्षेत चक्क 95.2 टक्के गुण मिळवून आपल्या शाळेचा विश्वास सार्थ केला आहे.
लिनाच्या आई घटस्पोटीत आहेत. त्या एकटयाच रहात असल्याने लिनाच्या स्कोलायसीस या दुर्धर आजारावरील शस्त्रक्रीयेसाठी होणारा लाखो रूपयांचा खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली होती. परंतु सेंट मेरी शाळेच्या प्रिन्सिपल मीना यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना लिनाच्या उपचारांसाठी मदतनिधी उभारण्याचे आवाहन केले. साऱ्यांनीच क्षणाचाही विचार न करता जमेल तसे पैसे शाळेकडे जमा केले आणि काही वेळातच 3 लाख रुपये जमा झाले. त्या पैशांच्या मदतीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात लिनावर शस्त्रक्रिया पार पडली. ऑपरेशननंतर काही महिने लिनाला अंथरूणावरून हलताही येत नव्हते. त्यामुळे शाळेत जावून शिकणार कसे आणि परिक्षा तरी देणार कशी, अशा विवंचनेत ती असताना शाळेचे शिक्षक तिच्या मदतीला पुन्हा एकदा धावून आले. तिच्या घरी जावून तिचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण करून घेतला. लिनाला हालचाल करता येत नसल्याने तीची आई व छोटी बहिण श्रावणी तिला दहावीच्या अभ्यासक्रमातील धडे वाचून दाखवित असत व लिना ते एकाग्रतेने ग्रहण करून स्मरणात ठेवी. अशा पध्दतीने शाळेचे शिक्षक, वर्गातील मित्र मैत्रिणी आणि साऱ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे चीज झाले आणि दहावीच्या परीक्षेत 95 टक्क्यांची मजल लिनाने मारली. लिनाच्या या जिद्दीचे तसेच तिला मदत करणाऱ्या शिक्षक, आई, बहिण आणि मित्रमैत्रिणींचे सर्वत्र कौतूक होत आहे. केवळ सगळ्यांनी मदत केल्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो,हे लिना आवर्जून सांगते.