वाहनचालकांसाठी शौचालय बांधा अन्यथा कारवाई

एमआयडीसीतील कंपन्यांना नवी मुंबई महापालिकेचा इशारा

नवी मुंबई, 21 जून 2017/AV News Bureau:

एम.आय.डी.सी.तील विविध कंपन्यांमध्ये येणारे ट्रक, टेम्पोच्या चालक आणि क्लिनरसाठी प्रातर्विधीसाठी शौचालयांची प्राधान्याने सोय करावी अन्यथा संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबई महापालिकेने दिला आहे.

हागणदारीमुक्त नवी मुंबई करीता आयुक्तांच्या संकल्पनेतून “गुड मॉर्निंग पथक” संकल्पना राबविण्यात येत आहे. एम.आय.डी.सी.तील विविध कंपन्यांमध्ये येणारे ट्रक, टेम्पो यांच्यावरही धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल, इंडियन गॅस अशा कंपन्यांची इंधन व गॅस वाहून नेणारी वाहने तसेच इतर कंपन्यांमधील जड वाहने रस्त्याच्या कडेला त्यांचा नंबर येईपर्यंत रांगेत दोन-तीन दिवस उभे असतात. या वाहनांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रातर्विधीची सोय कंपन्यांनी केलेली नसते. त्यामुळे ब-याचदा हे कर्मचारी नैसर्गिक विधी रस्त्यावरच उरकतात. यामुऴे परिसरात अस्वच्छता पसरते. त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या वाहनचालक व क्लिनर यांच्या करीता शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही कंपनीने याविषयी योग्य ती पावले न उचलल्यास पर्यावरण कायदा 1986 च्या कलम 16(1) अन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र दिेले जाणार आहे.

दरम्यान, गूड मॉर्निंग पथकाने 19 जूनपासून विभागनिहाय गांवठाण, झोपडपट्टी क्षेत्र, नाले व रेल्वे रुळास लागून असलेल्या जागा या ठिकाणी धडक मोहीमा राबवून उघडयावर शौचास बसणाऱ्या इसमास पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत 26 हजार रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे.अशाच प्रकारे साफसफाईनंतर रस्ते व पदपथावर कचरा फेकणाऱ्या दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई करीत 14 हजार 750 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.