बोर्ली-मांडला, 21जून 2017/AV News Bureau:
रायगड जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या हद्दीत सुमारे 431 इमारती आणि घरे धोकादायक असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. संबंधित मालमत्ताधारकांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या अनेक नगरपंचायतींमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू असून धोकादायक बांधकामांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
2017 च्या आकडेवारीनुसार माथेरान नगरपालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 148 धोकादायक इमारती व घरे असल्याचे समजते. माथेरान हा डोंगराळ भाग आहे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन डोंगराच्या कडेलगत असलेली घरे ढासळण्याची शक्यता लक्षात घेवून कडेलगत असणाऱ्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. त्या खालोखाल पेण मध्ये 92, उरण 90, मुरुड – जंजिरा 23 , महाड 22, कर्जत 20, अलिबाग 17, रोहा 9, श्रीवर्धन 8, खोपोली 2 अशी एकूण 431 धोकादायक इमारती व घरे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कड्यालगत असलेल्या घरांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. मात्र परिस्थितीचे गांभिर्य पाहता पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावेच लागतील.
– डॉ सागर घोलप, मुख्याधिकारी. माथेरान नगरपरिषद, रायगड