मुंबई,20 जून 2017/AV News Bureau:
समाजातील आत्ममग्न (ऑटिझम) अपंगत्वाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी येत्या शुक्रवारी, 23 जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आत्ममग्न मुलांचे पालक, शिक्षक व तज्ञांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
समाजात आत्ममग्न मुलांचे प्रमाण वाढत आहे. या दिव्यांगत्वाविषयी समाजात तसेच पालकांमध्ये जनजागृती व्हावी, त्या मुलांना सर्वसमावेशित शिक्षण घेता यावे,त्यांना योग्य असे कौशल्य शिक्षण मिळावे, जेणेकरून ही मुले आत्मनिर्भर व स्वावलंबी होतील, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यशाळेत सामान्य शाळांचे शिक्षक, विशेष शाळांचे शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विषयतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आदी सहभागी होणार असून विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत राज्यभरातून साडेसातशेहून अधिक लोकांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती अंपग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.