एका महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार
नवी मुंबई, 20 जून 2017/AV News Breau:
तुकाराम मुंढे नवी मुंबईतून बदली होवून गेले असले तरी लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावरील राग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळेच मुंढे यांनी आपल्या आयुक्तपदाच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे महापालिकेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी आज पार पडलेल्या महासभेत केला. या निर्णयांची चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यास महासभेने मंजूरी दिली आहे. या समितीचा अहवाल एका महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.
तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून मे 2016 ते मार्च 2017 या कालावधीत काम केले. या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधींचा राग ओढवून घेतला. मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी अशी मागणी आज झालेल्या महासभेत नगरसेवकांकडून करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र इथापे यांनी याबाबत सभागृहात लक्षवेधी मांडून चौकशी समितीची स्थापना करण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर महासभेने चौकशी समिती नेमण्यास मंजूरी दिली.
पक्षीय बलाबलनुसार 15 सदस्यांची तदर्थ समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये दोन तज्ज्ञ असणार आहेत. महापौर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. आजच ही समिती गठित करण्यात येणार आहे. एक महिन्यात ही समिती आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे. त्यानंतर राज्य सरकार याबाबत पुढील निर्णय घेईल, अशी माहिती महापौर सुधाकर सोनावणे यांनी अविरत वाटचाल न्यूजला दिली.