मुंबई, 20 जून 2017/AV News Bureau:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रभावित झालेल्या आदिवासींच्या पुनर्वसनासाठी पनवेल तालुक्यात भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील पनवेल तालुक्यातील पारगाव येथील कोळी आदिवासी वाडीच्या पुनर्वसनासाठी नवीन पनवेल येथील भूखंड देण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील मौजे पारगाव येथील सर्वे क्रमांक 89/1 मधील 6.07 हेक्टर सरकारी गुरचरण असणारी जमीन शहर व औद्योगिक विकास महामंडळाकडे (सिडको) वर्ग करण्यात आली आहे. मात्र, या जमिनीवरील आदिवासी कोळी लोकांची घरे असलेली 2.11 हेक्टर जमीन वगळली होती. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे लाईन, दीपक फर्टिलायझर्सची गॅस पाईपलाइन आदी कारणांमुळे हे क्षेत्र राहाण्यासाठी सुरक्षित नसल्याने येथील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना भूखंड देणे प्रस्तावित होते. त्यानुसार नवीन पनवेल, सेक्टर 16 येथील भूखंड क्रमांक 6 या भूखंडापैकी 5 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड कोळी आदिवासीवाडीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.