संसदेत विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जीं घोषणा करणार
नवी दिल्ली, 20 जून 2017:
येत्या 1 जुलैपासून संपूर्ण देशात वस्तु आणि सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेठली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 30 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे जीएसटीची औपचारीक घोषणा करणार असून त्यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जेठली यांनी सांगितले.
केरळ आणि काश्मीर वगळता जीएसटी संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून लागू होणार आहे. केरळ विधानसभेत पुढील आठवड्यात सीएसटी कायदा मंजूर केला जाईल तर काश्मीरमध्येही त्यादिशेने काम सुरू असल्याचे जेठली यांनी यावेळी सांगितले.
जीएसटी परिषदेने सर्व राज्यांच्या सहमतीनेच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून देशाच्या जीडीपीवरही सकारात्मक परिणाम होणार असल्याचेही जेठली म्हणाले.
दरम्यान, 30 जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी सुरू करण्याबाबतचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रपती जीएसटीची औपचारीक घोषणा करतील. यावेळी जीएसटीबाबत माहिती देणारे दोन लघुपटही दाखविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जीएसटीचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.