नवी दिल्ली, 19 जून 2017/AV News Bureau:
भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी एनडीएतर्फे रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषदेत कोवित यांच्या नावाची घोषणा केली. रामनाथ कोविंद हे बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले रामनाथ कोविंद यांनी भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहीले आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही शाह यांनी सांगितले.
एनडीएतर्फे राष्ट्रपतीपदासाठी निश्चित केलेल्या उमेदवाराबाबत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना कळविण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही याबाबत कळविण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार निश्चित झाले असून याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविण्यात येणार असल्याचेही अमित शाह यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू होती. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्वसंमतीने निवडला जावा, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. त्यानुसार सर्व राजकीय पक्षांशी चर्चाही करण्यात आली. मात्र कुठेही चर्चेत नसलेले रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी साऱ्यांनाच धक्का दिला आहे.
रामनाथ कोविंद यांच्याविषयी थोडक्यात
- 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर प्रदेशमधील कानपुर देहात येथे जन्म झाला.
- दलित कुटुंबात जन्मलेल्या रामनाथ कोविंद यांनी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत आपले शिक्षण पूर्ण केले. बी कॉम नंतर एलएलबी करून त्यांनी वकिली सुरू केली.
- केंद्र सरकारसाठी 1977 ते 1979 याकाळात दिल्ली उच्च न्यायालयात काम पाहीले तर 1980 ते 1993 या काळात सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे काम पाहीले.
- राजकारणात सक्रीय झाल्यानंतर 1994 ते 2006 मध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले.
- कोविंद यांनी अनुसूचित जाती/जमाती कल्याण संसदीय समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहीले आहे. याशिवाय गृहमंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, सामाजिक न्याय, विधी मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राज्यसभा गृहनिर्माण समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
- डॉ. बाबासाहेबा आंबेडकर युनिव्हर्सिटी, लखनऊच्या संचालक मंडळाचे सदस्य, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट,कोलकाताच्या राज्यपालांच्या मंडळाचे सदस्य राहीले आहेत.
- कोविंद यांनी 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथे झालेल्या सभेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
- 8ऑक्टोबर 2015 पासून ते बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.