नवी मुंबई महापालिकेच्या 20 शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे पैसे
स्वप्ना हरळकर/ AVIRAT VAATCHAL NEWS
नवी मुंबई, 19 जून 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीपोटी शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक वर्षासाठीचे सुमारे दीड कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. 20 शाळांमधील सुमारे 6 हजार 545 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तब्बल 1 कोटी 41 लाख 82 हजार 430 रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याऐवजी त्यासाठी लागणारी रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयाला अनेक लोकप्रतिनिधींनी विरोध केला असला तरी या निर्णयाची यापुढेही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यापार्श्वभूमीवर 6 डिसेंबर 2016 च्या शासनाच्या आदेशानुसार महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनी शालेय वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांची देयके पालिकेकडे द्यावीत असे कळविण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने 30 मार्च 2017 रोजी या आदेशाला मंजुरी दिली. महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यानंतर विद्यालय विकास समितीच्या माध्यमातून पालकांच्या सभा घेऊन जवळपास 21 हजार विद्यार्थ्यांनी बँकेत खाती उघडली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या 53 पैकी 20 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्त आल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली.
दरम्यान, अद्याप 33 शाळांमधील विद्यार्थ्यांची देयके त्यांच्या खात्यात जमा करायची आहेत. मात्र तीदेखील लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहेत. त्याबाबतचे काम सुरू असल्याचे संगवे यांनी सांगितले.
- शाळा क्रमांक आणि विद्यार्थ्यांना दिलेली रक्कम