गाईचे 27 तर म्हशीचे 36 रुपये प्रति लिटर दूध उत्पादकांना मिळणार
ग्राहकांसाठी दूध विक्रीचे दर वाढवणार नाही- राज्य सरकार
मुंबई, 19 जून 2017/AV News Bureau:
राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रति लिटर 3 रुपये दरवाढ करण्यास मान्यता दिली आहे. नवीन दरामुळे दूध उत्पादकांना गाईच्या दूधासाठी प्रतिलिटर 24 ऐवजी 27 तर म्हशीच्या दूधासाठी 33 ऐवजी 36 रुपये असा दर मिळणार आहे. दरम्यान दूध उत्पादकांसाठी 3 रुपये प्रति लिटर दरवाढ करण्यात आली असली तर ग्राहकांसाठी दूध विक्रीचे दर वाढविण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
दूधाचे दर वाढवावे अशी मागणी सातत्याने दूध उत्पादकांकडून केली जात आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने दूधाचे नवीन दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दूध उत्पादकांना दिलासा देतानाच ग्राहकांना जुन्याच दराने दूध विकले जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. तसेच यापुढे महागाई निर्देशांक लक्षात घेवून राज्यातील दूध खरेदी, विक्री दरांबाबत वर्षातून एकदा बैठक घेण्यात येईल आणि दूध खरेदी,विक्रीचे दर निश्चित केले जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
- दूध उत्पादकांना ऑनलाइन पैसे द्या
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदीची रक्कम थेट त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याचे आदेशही राज्य शासनाने दूध खरेदी करणाऱ्यांना दिले आहेत.