नवी दिल्ली, 19 जून 2017:
मंगळग्रहाचा अभ्यास करण्यासाठी झेपावलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या मंगळयानाने आज अंतराळातील एक हजार दिवसांचा टप्पा गाठला आहे. भारतीय अवकाश संसोधन संस्था- इस्रोने 5 नोव्हेंबर 2013 मध्ये अवकाशात सोडलेल्या मंगळयानाने 24 सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावण्याची कामगिरी केली होती. संपूर्ण देशी बनावटीच्या आणि विविध वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण जगाचे भारताच्या मंगळ मोहिमेकडे लक्ष लागलेले आहे. अतिशय कमी खर्च आणि कमी वेळेत अंतराळातील माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे सोपविण्याचे काम या मंगळ मोहिमेतून शक्य झाले आहे. या उपग्रहाने मंगळ ग्रहाभोवती आतापर्यंत 388 फेऱ्या मारल्या आहेत. तसेच हा उपग्रह अद्याप सुस्थितीत असून आपले काम योग्य प्रकारे करीत असस्याचे इस्रोने म्हटले आहे.
मंगळयानाकडून प्राप्त माहिती आणि आकड्यांचे विश्लेषण भारतीय वैज्ञानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या माहितीचा अभ्यास करण्यासाठी देशातील विविध वैज्ञानिकांनाही संधी देण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे.
मंगळयानाच्या मार्स कलर कॅमेऱ्यात कैद झालेली तब्बल 715 छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मंगळ ग्रहाविषयीची अनेक नवी माहिती उजेडात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही, याचा अभ्यास जगभरातील वैज्ञानिक करीत आहेत. भारतानेही आपली मंगळयाने मोहीम सुरू करून यादिशेने पावले उचलली आहेत. त्यामुळे भारत नव्याने कोणते संशोधन करील,याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.