मध्यावधी निवडणुका झाल्यास भाजपला बहुमत

अमित शाह यांचा विश्वास

मुंबई, 17 जून 2017/AV News Bureau:

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची वेळ येणार नाही. मात्र निवडणुका झाल्याच तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी मध्यावधी निवडणुकांबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून शिवसेनेनेही आक्रमक भूमिका मांडली होती. यापार्श्वभूमीवर शाह यांनी स्पष्ट केले की, भाजपला मध्यावधी निवडणुका नकोत. मात्र मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागले तर भाजप पूर्ण ताकदीने लढेल आणि स्पष्ट बहुमतही मिळवेल, असे शाह यांनी सांगितले.

सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अतिशय चांगली कामगिरी करीत आहे.सध्याचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप सर्वच पक्षांशी चर्चा करणार आहे. सर्व पक्षांच्या सूचना ऐकून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शाह यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.