जम्मू-काश्मीर, 16 जून 2017:
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा उपद्रव कमालीचा वाढला आहे. सशस्त्र दहशतवाद्यांनी आज संध्याकाळी पोलिसांच्या तुकडीवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 6 पोलीस शहीद झाल्याची घटना अनंतनाग जिल्ह्यात घडली. मृतांमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने त्वरीत घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करीत आहेत. मात्र सतर्क भारतीय जवान त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. दुसऱ्या एका घटनेत अनंतनाग जिल्ह्यातील बीजबेहारा भागातील अरवानि गावात सीमा सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतादी ठार झाला आहे. तसेच दोन नागरिकही ठार झाल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचा वाढलेला उपद्रव लक्षात घेवून भारतीय लष्कराने त्यांचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आल्याचे वृत्त आहे.