नवी मुंबई,16 जून 2017/AV News Bureau:
घणसोली परिसरातील अतिक्रमणांविरोधात कारवाई केल्याप्रकरणी महापालिका कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळी महापालिका मुख्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन केले होते.
घणसोली विभाग कार्यालयाअंतर्गत असलेल्या गोठवली गावातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. या कारवाईने संतप्त झालेल्या काही व्यक्तींनी विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे आणि कनिष्ठ अभियंता विनोंद आंब्रे यांना मारण्याची धमकी दिली. तसेच घणसोली विभाग कार्यालयात घुसून सरकारी मालमत्तेचे नुकसान करून तेथील कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि धक्काबुकी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर द्वारसभा आयोजित केली होती. यावेळी महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांनी दिली.