तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनची सिडकोकडे मागणी
नवी मुंबई, 14 जून 2017/ AV News Breau:
बेलापूर ते पेंधर दरम्यान सुरू होणारी मेट्रो तळोजा एमआयडीसी पर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी तळोजा इंडस्ट्रीज असोशिएशनच्या (TIA) वतीने सिडकोकडे करण्यात आली आहे. त्या संदर्भात तळोजा इंडस्ट्रीज असोशिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
मेट्रोची सुविधा तळोजा एमआयडीसी पर्यंत वाढविण्यात आल्यास तीन लाख कामगारांच्या प्रवासाची सोय होण्यास मदत होईल असे मत तळोजा इंडस्ट्रीज असोशिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. तळोजा CETP च्या जवळून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर उड्डाण पूल बांधण्यात आले आहे. या उड्डाण पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये येणा-जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे, त्यामुळे या रस्त्यांचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी सुद्धा असोशिएशनने केली आहे. या शिवाय सिडको वसाहतीमधील आणि तळोजा एमआयडीसी यामध्ये अजिबात अंतर अथवा मोकळी जागा नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे या दोन्ही दरम्यान पर्याप्त मोकळी जागा असली पाहिजे, अशी देखील मागणी असोशिएशनने सिडकोकडे केली आहे. दरम्यान आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी तळोजा इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी (अण्णा), उपाध्यक्ष बाबू जॉर्ज, उपाध्यक्ष पी. बी. लोगावी, कोषाध्यक्ष एस. एस. शेट्टी, सदस्य बिनेट सालियन, सदस्य व कार्यकारी सचिव सुनील पदिहारी आदि यावेळी उपस्थित होते.