मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
मुंबई, 12 जून 2017/AV News Bureau:
गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड तसेच तुकडे ठेवण्याचे प्रकार घडलेले असतानाच आता पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रुळावर लोखंडी रॉड आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री वसई- नालासोपारा दरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, यामागे कोणताही घातपात नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी गाडी नालासोपारा स्थानकाजवळ येताच मोटरमन नितीन चंदनशिवे यांना रुळांवर एक रॉड पडलेला दिसला. त्यामुळे मोटरमनने लगेचच गाडी थांबवली आणि रेल्वे मार्गावरील रॉड बाजूला केला. हा रॉड रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान या घटनेमागे कोणत्याही घातपाताची शक्यता नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वे मार्गालगतच रेल्वेच्या एका पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रॉड चुकून रूळावर पडल्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी दिली.
दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये रेल्वे रुळांवर लोखंडी तुकडे टाकण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. मात्र मोटरमन तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळल्या होत्या.