नवी दिल्ली, 12 जून 2017/AV News Bureau:
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्वसंमतीने निवडला जावा यासाठी इतर राजकीय पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी भाजपने तीन सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये केंद्र सरकारमधील तीन वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही समिती नेमली आहे.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे युपीए तसेच एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविताना सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून सर्वसंमतीने उमेदवार ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी राजनाथ सिंह, अरुण जेठली आणि व्यंकय्या नायडू या तीन वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जून आहे. त्यामुळे सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी अमित शहरा यांनी यी तीन वरिष्ठ मंत्र्यांवर सोपवली आहे. त्यामुळे युपीएमधील घटक पक्षांशी हे भाजपचे हे तिन्ही वरिष्ठ मंत्री कशाप्रकारे चर्चा करतात आणि तोडगा काढतात, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.