22 लाखांची दंड वसूली
मुंबई, 12 जून 2017/AV News Bureau:
बेस्ट बसगाड्यांमधून विना तिकिट प्रवास करणाऱ्या तसेच काढलेल्या तिकिटाच्या किंमतीपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टने जानेवारी ते एप्रिल महिन्यात धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 25 हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांकडून 22 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.
मुंबईकरांसाठी बेस्ट दिवसरात्र धावत असते. मात्र अनेकदा काही प्रवासी तिकिट न काढताच प्रवास करतात वा अनेकदा काढलेल्या तिकिटापेक्षा अधिक अंतर प्रवास करतात. अशा तिकिट न काढणाऱ्या फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टचे नुकसान होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांविरोधात बेस्टने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत धडक मोहिम राबविली. या मोहिमेत तब्बल 25 हजार 575 प्रवासी विनातिकिट वा तिकिटापेक्षा अधिक अंतर प्रवास केलले आढळून आले. या प्रवाशांकडून दंडापोटी 22 लाख 37 हजार 751 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी दिली.
बेस्ट बसने प्रवास करताना एखाद्या प्रवाशाकडे तिकिट नसले तर त्याच्याकडून तिकिटाच्या दहापट रक्कम दंडापोटी वसूल केली जाते. तसेच एखाद्या विनातिकिट प्रवाशाने दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास त्याच्यावर मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 460 (ह) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. यापार्श्वभूमीवर प्रवाशांनी योग्य तिकिट खरेदी करून प्रवास करावा आणि स्वतःचे नुकसान टाळावे, असे आवाहन बेस्टने केले आहे