कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास किंमत मोजावी लागेल

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 11 जून 2017:

विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढले व त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा लढा उभारला. कर्जमाफीसंदर्भातील निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील दिला.

राज्यभरातील शेतकरी संघटीत झाल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण होऊन त्यांना शेतकरी कर्जमाफीला तत्वतः मान्यता देणे भाग पडले. हे सरकार शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला दाद द्यायला तयार नसल्याने काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन ठप्प केले होते. त्यानंतर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करून राज्यातील वातावरण ढवळून काढले. संघर्ष यात्रेला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळेच सरकार बॅकफूटवर आले आणि कर्जमाफीसंदर्भात त्यांना आपला दृष्टीकोन बदलणे भाग पडले,असे विखे पाटील म्हणाले.