नवी दिल्ली, 11 जून 2017:
भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंनी चांगलाच धुमाकूळ घातलेला असताना भारताच्या एका चित्रपटाने चीनच्या लोकांना चांगलेच नाचवले आहे. आमिर खानचा दंगल हा चित्रपट चीनमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की, त्याने कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. केवळ चीनची जनताच नव्हे तर साक्षात चीनचे राष्ट्रपतीदेखील दंगलचे फॅन आहेत. या चित्रपटाने आपल्याला प्रभावित केल्याचे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.
गेल्या महिन्यात 5 मे रोजी दंगल चीनमध्ये प्रदर्शित झाला. चीनमधील तब्बल 7000 पेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये दंगल दाखविण्यात आला आणि अजूनही प्रेक्षक गर्दी करीत आहेत. या चित्रपटाने चीनमध्ये आतापर्यंत 1100 कोटी रुपयांची कमाई केली असून चीनमधील चित्रपट कमाईचे सर्व विक्रम त्याने तोडले आहेत. चीनमध्ये एक अब्ज युआन (14.7 कोटी डॉलर) पेक्षा अधिक कमाई करणाऱ्या आतापर्यंतच्या एकूण 33 चित्रपटांपैकी दंगल हा एक ठरला आहे.
शांघाई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका वार्षिक शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, तेव्हा दंगल चित्रपट चीनमध्ये चांगलाच गाजत असल्याचे जिनपिंग यांनी मोदी यांना सांगितल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले.