एसटीची एसी शिवशाही फुल्ल

मुंबई,10 जून 2017/AV News Bureau:

मुंबई सेंट्रल ते रत्नागिरीदरम्यान आजपासन धावणाऱ्या एसटीच्या एसी शिवशाही (shivshai bus) बसला चाकरमान्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरीहून उद्या (रविवार, ता.११)  येणाऱ्या बसची तिकिटेही हातोहात विकली गेल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

आजपासून सुरू झालेल्या मुंबई-रत्नागिरी एसी शिवशाही (shivshai bus) बसची ४५ पैकी ४० तिकिटे  विकली गेली आहेत. तर उद्या, रविवारची रत्नागिरी-मुंबई बसची सर्वच्या सर्व ४५ तिकिटे विकली गेल्याची माहिती एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात खासगी ट्रॅव्हल्स सुळसुळाट आहे. मात्र आता एसटीने उच्च दर्जाची सेवा आपल्या कोकणातल्या प्रवाशांना देण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसी शिवशाही (shivshai bus)बस आजपासून सुरू करण्यात आली आहे. ४५ पूशबॅक आसनक्षमता असलेल्या या बसमध्ये प्रत्येक प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रीन आणि हेडफोन्सद्वारे एफएमचीदेखील सुविधा पुरविण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी दरम्यान आठ थांबे घेणारी ही लक्झरी बसचे भाडेही ५५६ रुपये इतके आहे. रात्री पावणेदहा वाजता सुटणारी ही बस सकाळी ७ वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे. तर रात्री १० वाजता रत्नागिरीहून निघून सकाळी ७ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे. गारेगार आरामदायक प्रवास  आणि मनोरंजनाची सुविधा असल्यामुळे या एसी बसला कोकणातल्या चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.