पुणे आणि नागपूर येथे मध्यवर्ती कॉल सेंटर प्रस्तावित
मुंबई, 9 जून 2017 /AV News Bureau:
राज्यातील पोलिस, अग्नीशमन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा 112 या एकाच क्रमांकावर आणण्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. आपत्कालिन परिस्थितीमध्ये राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीत मदत होईल. पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका यासोबतच महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठीच्या हेल्पलाईन सेवा या सर्व सेवांसाठी आता 112 क्रमांक ठेवण्यात येणार आहे. या सेवेसाठी पुणे आणि नागपूर येथे मध्यवर्ती कॉल सेंटर प्रस्तावित असल्याचे सादरीकरण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले.
या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथुर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम, वित्त विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक आदींसह पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या सेवेसाठी ग्रामीण भागात 1048 तर शहरी भागात 454 चारचाकी वाहनांची आवश्यकता असून ग्रामीण भागात 2021 दुचाकी आणि शहरी भागात 241 दुचाकी वाहने ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोलिस नियंत्रण कक्षाचे आधुनिकरण करण्याचाही प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपत्कालिन परिस्थितीत या क्रमांकावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे स्थान (लोकेशन) समजू शकेल अशी यंत्रणा तयार करावी यामुळे संकटात सापडेल्या व्यक्तीला तातडीने मदत करता येवू शकेल. कॉल सेंटरला कॉल आल्याबरोबरच तातडीने प्रतिसाद दिला पाहिजे. त्याचबरोबरच कॉल सेंटरला शक्यतो स्थानिक भाषेत प्रतिसाद देणार व्यक्ती असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.