नवी मुंबई, ८ जून २०१७/AV News Bureau
कोकण रेल्वे अधिकाधिक गतीमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी या मार्गावर २१ नवीन रेल्वे स्थानके बांधण्याचे प्रस्तावित आहे. या नव्या स्थानकांमुळे एकूण रेल्वे स्थानकांची संख्या ८७ होणार असून दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर १२.७५ कि.मी. वरून ८.३ कि.मी. इतके कमी होणार आहे. याशिवाय रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा विस्तारही वाढविण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोकण रेल्वेचे महासंचालक (नियोजन आणि व्यापार विकास विभाग) जोसेफ ई जॉर्ज यांनी बुधवारी याबाबातची माहिती पणजी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कोकण रेल्वेच्या विस्तारीकरणामध्ये मार्गाचे दुपदरीकरण हा महत्वाचा भागा आहे. एकूण १४७ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाच्य दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे ३५ कि.मी. लांबीचे दुपदरीकरणाचे काम गोवा राज्यात होणार असल्याचेही जॉर्ज यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतिकरणाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ध्येय आहे. साधारणपणे १ हजार ११० कोटी रुपये या कामासाठी खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन रेल्वे स्थानकांबाबत याआधीच घोषणा करण्यात आली असून सदर प्रस्ताव रेल्वे मंत्रालय तसेच संबंधित आस्थापनांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच पुढील काम सुरू होईल, असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल.के.वर्मा यांनी स्पष्ट केले.