नवी मुंबई पोलिसांचा मॉक ड्रील
चार दहशतवाद्यांचा खातमा, दोघांना पकडले
नवी मुंबई, 7 जून 2017/AV News Bureau:
स्थळ – सीवूड सेंट्रल मॉल. सकाळचे 10.30 वाजले होते. मॉलला लागूनच सीवूडस् रेल्वे स्थानक असल्यामुळे नोकरदार वर्गही कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जात होता. तर काही जण मॉल परिसरात खरेदीसाठी आले होते. त्यामुळे सकाळपासूनच सीवूड रेल्वे स्थानक परिसर गजबजलेला होता. अचानक शस्त्रधारी कमांडोजनी संपूर्ण मॉलला वेढा घातला. सशस्त्र पोलिसांना पाहून नागरिकांची घाबरगुंडीच उडाली. मॉल परिसरात असलेल्यांची एकच तारांबळ उडाली. मॉलमध्ये दहशतवाद घुसले असून त्यांना पकडण्यासाठी सशस्र कमांडो कारवाई सुरू करण्यात आली होती.त्यामुळे लोकांमध्येही काहीशी घबराटीचे वातावरण पसरले. मात्र थोड्याच वेळात लोकांना खरा प्रकार कळला. नवी मुंबई पोलिसांनी दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी ही रंगीत तालिम केल्याचे लोकांच्या लक्षात आले आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.
या मॉक ड्रीलमध्ये 37 पोलिसांचे विशेष पथक आणि पाच अधिकाऱ्यांनी या भाग घेतला. याशिवाय अग्निशमन दल, वैद्यकीय पथकही सहभागी झाले होते. मॉलसारख्या गजबजलेल्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास कशाप्रकारे कारवाई करायची याची आज रंगीत तालिम घेण्यात आली. या मॉक ड्रीलमध्ये सहा दहशतवाद्यांचा खातमा करण्याची जबाबदारी सशस्त्र कमांडोजवर सोपवण्यात आली होती. सशस्त्र कमांडोजनी अतिशय शिस्तबद्धपद्धतीने कारवाई करीत सहापैकी चार दहशतवाद्यांना ठार केले तर दोघांना जीवंत पकडल्यानंतर ही रंगीत तालिम थांबविण्यात आल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांनी दिली.