441 बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत होणार निर्णय
नवी मुंबई, 11 मे 2017/AV News Bureau:
नवी मुंबई शहराच्या हद्दीतील बेकायदेशीर ठरवलेल्या सुमारे 441 धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. या धार्मिक स्थळांबाबतचा पोलीस यंत्रणा तसेच इतर आस्थापनांकडून अंतिम अहवाल मागविण्यात आला आहे. येत्या 14 जून रोजी बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबतची अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे.
माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मुंडे यांच्या या कारवाईमुळे स्थानिक भूमीपुत्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. शहरातील बेकायदेशीर बांधकामांबाबतच्या कारवाईवरून तसेच सरकारच्या प्रस्तावित धोरणाविरोधात भूमिका घेतल्यामुळे मुंडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र बदली होण्यापूर्वीच मुंडे यांनी शहरातील 441 बेकायेदशीर धार्मिक स्थळांवर मे अखेरपर्यंत ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता नवीन पालिका आयुक्त रामास्वामी एन. या धार्मिक स्थळांबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिका प्रशासनाकडे शहरातील 483 अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी उपलब्ध आहे. त्यापैकी 31 डिसेंबर 2016 पर्यंतची 22 धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली आहेत. तर 441 धार्मिक स्थळांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या बांधकामांना 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत निष्कासित करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र मुंडे यांनी मे अखेरपर्यंत या 441 धार्मिक स्थळांबाबत अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित केले होते. ही धार्मिक स्थळे नियमित वा स्थलांतरीत करता आली नाही तर त्यांच्यावर मे अखेरपर्यंत कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. परंतु अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान, शहरातील धार्मिक स्थळांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास सुरू आहे. तसेच संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्या अहवालानुसार आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.
अतिक्रमण विभागाच्या रडावर असलेली धार्मिक स्थळे