नवी मुंबई, 7 जून 2017/AV News Bureau:
आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी संपकाळात कृषी माल पाठविण्याचे बंद केल्यामुळे मुंबईसह इतर शहरांमधील कृषीबाजारपेठांमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतर वस्तू येत असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळत असल्याची माहिती एपीएमसीतील व्यापारी सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांना कर्जमाफी, कृषी मालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. शेतकऱ्यांच्या या संपामुळे शहरांना भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र एकीकडे राज्यातील विविध भागांतून येणारा कृषीमाल रोडावला असला तरी इतर राज्यांमधून भाजीपाला, फळे तसेच इतर कृषीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई,उपनगरे, पुणे आदी शहरांमध्ये पुरेशाप्रमाणात कृषीमालाची रोज आवक होत आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याचे दरही स्थिर असल्याचे आढळून आले आहे. शहरांमध्ये परराज्यांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतर वस्तूंचा पुरवठा सतत होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाची धार कमी झाली आहे. संपकाळात कृषीमाल उचलला गेला नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे परराज्यांतील शेतकऱ्यांच्या मालाला चांगलाच उठाव असल्यामुळे त्यांना फायदा झाल्याची माहिती एपीएमसीच्या व्यापारी सूत्रांनी दिली.
संपकाळातच गेल्या दोन दिवसांपासून वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालाची समाधानकारक आवक होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दरही स्थिर आहेत.सध्या बाजारात गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. तर नाशिक, पुणे, सातारा येथूनही आता काही प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधून बटाटा तर मध्य प्रदेश, राजस्थानमधून लसणीची आवक होत आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक येथील मुख्यतः व्यापाऱ्यांकडून पुरेशा प्रमाणात कांदा बाजारात दाखल होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
वाशीच्या पाचही मार्केटमध्ये आज दिवसभरात सुमारे 1781 गाड्यांची आवक झाल्याची नोंद आहे. तर 1 हजार 524 गाड्या कृषी माल घेवून मुंबई आणि इतर बाजारांमध्ये पाठविल्या गेल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
- फळ मार्केटमध्ये 513 गाड्यांची आवक झाली तर 560 गाड्यांची जावक आहे.
- भाजीपाला मार्केटमध्ये 676 गाड्यांची आवक आणि 720 गाड्यांची जावक
- कांदा बटाटा मार्केटमध्ये 218 गाड्यांची आवक आणि 153 गाड्यांची जावक आहे. (कांदा 157,बटाटा 57, लसूण 4 गाडी आवक)
- मसाला मार्केटमध्ये 133 गाड्यांची आवक आणि 34 गाड्यांची जावक
- धान्य मार्केटमध्ये 241 गाड्यांची आवक आणि 57 गाड्यांची जावक
दरम्यान, परराज्यांतून येणाऱ्या मालाची आवक घटल्यास जीवनावश्यक वस्तुंचे भाव कडाडण्याची भिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाबाबत सकारात्मक तोडगा निघण्याची गरज आहे. अन्यथा ऐन पावसाळ्यात भाजीपाला आणि इतर कृषीमालाची आवक कमी झाल्यास त्याचा मोठा फटका शहरी नागरिकांना बसण्याची भिती व्यक्त होत आहे.