- शेतकऱ्यांचा संपाचा दुसरा दिवस
- शहरांमध्ये महागाईचा भडका उडण्याची भितीनवी मुंबई, 2 जून 2017/AV News Bureau: कृषी मालाला हमी भाव मिळावा तसेच इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपामुळे वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत येणाऱ्या मालाची आवक मंदावली असून कांद्याची एकही गाडी दाखल झालेली नाही. इतर राज्यांतून आलेला भाजीपाला मर्यादीत असल्यामुळे दर 70 ते 80 टक्क्यांनी वाढल्याची माहिती मार्केट सूत्रांनी दिली.वाशी भाजी मार्केटमध्ये दिवसाला सुमारे 600 गाड्या दाखल होतात. त्यापैकी आज केवळ 148 गाड्या आल्या आहेत. 452 गाड्या बाजारात आल्याच नाहीत. 148 गाड्या या परराज्यातून आल्या आहेत. महाराष्ट्रातून एकही गाडी आज बाजारात आली नाही. भाज्यांची आवक मंदावल्यामुळे दर तीस ते चाळीस टक्के वाढले आहेत. कांदा- बटाटा मार्केटमध्येही केवळ 72 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र त्यामध्ये कांद्याची एकही गाडी आली नाही. बटाटे आणि लसूण यांचे दर 21 टक्यांनी वाढले आहेत. दरम्यान घाऊक बाजारात कांद्याचे दर 2 रूपये आणि बटाट्याचे दर 3 रूपयांनी वधारल्याची माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिली.
- फळ बाजारात 250 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र दरांमध्ये अद्याप फारसा बदल झाला नसल्याची माहिती फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली.शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळे दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा निघाला नाही तर शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याअभावी महागाईचा भडका उडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.